सातारा – मंत्री छगन भुजबळ यांनी कराडमध्ये येऊन दाखवावे

रेठरे बुद्रुक – मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांविरोधात गरळ ओकत आहेत. त्यांनी कराडमध्ये येऊन दाखवावे, असे आव्हान देत आम्ही त्यांना आमची ताकद दाखवू; असा सज्जड इशारा आटके, ता. कराड येथील सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे. त्याचबरोबर भविष्यात पुन्हा मराठा समाजाबद्धल अवमानकारक वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यात आला.
छगन भुजबळ यांच्यासह काही राजकीय नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाज बांधवांबाबत वादग्रस्त व अवमानकार वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांचा निषेध नोंदवत मनोज जरांगे-पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आटके गावातील मराठा समाजबांधव सोमवारी सायंकाळी एकत्र आले होते.
याप्रसंगी मंत्री भुजबळ यांच्यासह मराठा समाजाबाबत व मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा मराठा समाज बांधवांनी निषेध नोंदवला. मराठा समाज शांत आहे. लोकशाही मार्गाने मराठा समाज बांधव मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत.
मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही राजकीय पक्षांचे नेते आपल्या स्वार्थासाठी ओबीसी समाज बांधव व मराठा समाज बांधव यांच्यात गैरसमज निर्माण करून दंगल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या नेत्यांनी मराठा समाज व मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत अपप्रचार करणे न थांबवल्यास राज्यातील मराठा समाज बांधवांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावे मराठा समाज बांधवांनी दिला.





