सातारा – वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक डॉ. डी. एम. पाटील

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य अंगीकारित गेल्या 35 वर्षापासून रुग्णांच्या अहोरात्र सेवेसाठी वाहून घेतलेले वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक म्हटलं की डोळ्यासमोर नाव येते ते सातारा समर्थ मंदिर येथील डॉ. डी. एम. पाटील. त्यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…
गोरगरीब गरजू रुग्णांना आधार देणारे त्यांना औषधोपचार बरोबरच आधार देणारे नाव म्हटलं की सर्वांच्या समोर येतात ते डॉ. दिलीप मल्हारराव पाटील. डॉ. दिलीप पाटील यांचा जन्म कवठे, ता. वाई या ठिकाणी झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण, सेवा झाली ती सातारा येथेच. सुरुवातीस काही काळ शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. त्यानंतर त्यांनी परळी व सातारा समर्थ मंदिर या ठिकाणी दवाखाना सुरू केला. यावेळी येईल त्या रुग्णांवर औषधोपचार करीत असताना त्यांनी पैशापेक्षा सेवेला महत्त्व दिले. त्यामुळेच गोरगरिबापासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या मुखी डॉ. दिलीप पाटील म्हणजेच डी. एम. पाटील हे नाव नेहमीच असते.
वैद्यकीय सेवेत असताना त्यांची समाज सेवा ही नेहमीच कौतुकास्पद वाखाणण्याजोगी होती. ऊरमोडी नदीवर ठोसेघर पठारावर पवनचक्क्यांचे काम सुरू असताना तो पूल पाडण्यात येत होता. तसेच नवीन पुलाला टोल उभारणीसाठी त्या ठिकाणी टोल नाका उभारणीचे काम सुरू होते, याची चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्ष या टोलला विरोध करण्यासाठी कोणीही येत नव्हते. त्यावेळी डॉ. डी एम पाटील यांनी परळीला येत असताना अचानकच आपली गाडी बाजूला घेत या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन उभे केले. डॉक्टरांनी यावेळी उरमोडीचा जुला पूल पाडायचा नाही तसेच नवीन पूल बांधला तरीही या ठिकाणी टोल नाका उभारायचा नाही अशी आग्रही भूमिका घेत त्या ठिकाणी ठिय्या मांडला. डॉक्टर पुलावर बसले आहेत ही बातमी परळी परिसरात पसरली तसतसे त्यांना पाठिंबा देण्यासाठी भागातून लोक येऊ लागले यावेळी डॉ. पाटील यांना तालुका पोलीस स्टेशन यांनी अटक ही केली होती. मात्र मला जेलमध्ये टाकले चालेल मात्र या ठिकाणी टोल नाका उभारून देणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका होती.
त्यांच्या या भूमिकेमुळेच उरमोडी नदीवरील जुना पूल अजूनही अबाधित आहे. तसेच या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला नाही. परळी या ठिकाणी ओपीडी सुरू असताना डॉ. डी. एम. पाटील यांची समाजसेवा तसेच स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रहाची भूमिका कायम असायची यातूनच त्यांनी माहिती अधिकार तसेच लॉ.चे शिक्षण ही पूर्ण केले. वैद्यकीय सेवेत त्यांनी कधीही पैशाला महत्त्व न देता रुग्ण जेवढी फी देतील त्या फीमध्ये समाधान मानून त्यांना सेवा दिली त्यामुळेच परळी खोरे, सातारा शहर ,ठोसेघर पठार कुसवडे कास पठार त्याचबरोबर अगदी लांबून ही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात.
डॉ. डी. एम. पाटील त्यांच्याबरोबरच त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मृणालिनी पाटील (एम.बी.बी.एस.) डॉ. धैर्यशील पाटील (एम.डी मेडिसिन) डॉ. मानसी पाटील (एम.बी.बी एस) हे कुटुंबीय त्यांचे वैद्यकीय कार्य समाजसेवा पुढे नेत आहेत. डॉ. डी. एम. पाटील हे आमचे फक्त फॅमिली डॉक्टर नसून आमच्या गुरुस्थानी आहेत त्यांच्या अचूक निदानामुळे तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ! हे ब्रीद वाक्य त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अंगीकारल्यामुळे सातारा परळी ठोसेघर, कुसवडे अगदी जिल्ह्यातून त्यांच्याकडे रुग्ण आपुलकीने आपल्या वेदना दूर करण्यासाठी येत असतात. डॉ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा.





