Satara : शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून भोसरे येथील विवाहितेची आत्महत्या

औंध : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन मानसिक, शारीरिक छळ करुन पोलीस भरतीसाठी दोन- तीन लाख रुपये माहेरून आणण्याच्या मागणीसाठी झालेल्या छळास कंटाळून साक्षी अजय गुजर (वय 21, रा. भोसरे, ता. खटाव) हिने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ५ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सासरच्या जावई, सासू, दिर यांच्यावर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कविता अधिक माने (मूळ रा. उंब्रज ता. कराड, सध्या रा. कोलवडी ,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांची मुलगी साक्षी हिने दि. २ मार्च २०२३ रोजी अजय गुजर याच्यासोबत प्रेमविवाह केला.
प्रेमविवाह करुन आल्याचा राग आणि मुलीकडून लग्नात काही मिळाले नसल्याच्या रागातून हुंडा म्हणुन माहेरहून रोख रक्कम घेऊन येण्यासाठी वारंवार तिला त्रास दिला जात होता. दरम्यान, अजय याच्या पोलीस भरतीसाठी दोन तीन लाख रुपये लागणार आहेत, ते तुम्ही द्या, अशी मागणी होत होती. त्यावर माझ्याकडे इतके पैसे नाहीत आम्ही कुठून देणार, असे फिर्यादींने म्हणाले असता तुमचे घर विकून पैसे द्या असे त्यांना सांगण्यात आले.
पैसे देण्यास नकार दिल्यापासून साक्षीला तिचा नवरा अजय, सासू रुक्मिणी व दिर शेखर यांनी तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरु केला. या छळाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी जावई- विवाहितेचा पती अजय बाळू गुजर, सासु रुक्मिणी बाळू गुजर, दीर- शेखर बाळू गुजर (सर्व रा. भोसरे ता. खटाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औंध पोलिस तपास करत आहेत.





