सातारा – मांडुळाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

उंब्रज- सर्प जातीच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील टोळीला तळबीड पोलिसांनी शुक्रवारी दि. 16 रोजी जेरबंद केले. या कारवाईत एक कोटी दहा लाख रुपये किंमतीची मांडुळ तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले.
रुपेश अनिल साने (वय 25, रा. आड ता. पोलादपूर, जि. रायगड), अनिकेत विजय उत्तेकर (वय 27) व आनंद चंद्रकांत निकम (वय 35, दोघेही रा. कापडखुर्दे ता. पोलादपूर) यांना पोलिसांनी अटक केलीआहे. त्यांच्याजवळील एका पुठ्ठ्याच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये सर्प जातीचे मांडुळ आढळले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी पेट्रालिंग करत असताना कराड ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर वराडे गावामध्ये जय शिवराय हॉटेलजवळ काही लोक बेकायदेशीर सर्प जातीच्या मांडुळ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, काॅन्स्टेबल निलेश विभुते यांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलच्या आजूबाजूस सापळा लावला. सायंकाळी सातच्या सुमारास तीन जण दुचाकीवरून हॉटेलसमोरील रिकाम्या जागेत येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले.
वराडे येथील वनपाल सागर कुंभार यांनी मांडुळ असल्याची खात्री केली. पोलीसांनी संशयितांची चौकशी केली असता त्यांनी आनंद चंद्रकांत निकम यास शेतात काम करीत असताना दहा दिवसांपूर्वी मांडुळ आढळल्याचे व ते एक कोटी दहा लाख रुपये किंमतीला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्या तिघांविरुध्द तळबीड पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराडच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱयांकडे सुरक्षितेच्या दृष्टीने हे मांडुळ ताब्यात देण्यात आले आहे.
याप्रकरणी अटकेतील संशयितांकडे तपास सुरु आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक अशोक मदने, सहायक फौजदार काळे, खराडे, हवालदार आप्पा औंबासे, भोसले, संदेश दीक्षित, निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी केली.





