सातारा – महाड एमआयडीसीतील स्फोटात बेलवडेचा युवक बेपत्ता

कराड – महाड (जि. रायगड) येथील एमआयडीसीत ब्ल्यू जेट हेल्थकेअर या फार्मा कंपनीत काल (दि. 3) सकाळी लागोपाठ झालेल्या स्फोटांमुळे लागलेल्या आगीनंतर 11 जण बेपत्ता झाले. त्यामध्ये कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील अस्लम मेहबूब शेख (वय 27) याचाही समावेश आहे. या स्फोटातील बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.
या दुर्घटनेत अस्लम शेख हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, त्याचे आई, वडील, नातेवाइक आणि काही ग्रामस्थ महाडकडे रवाना झाले. बी. एससी.चे शिक्षण घेतल्यानंतर अस्लम शेखने सुरुवातीला कोकणातील लोटे परशुराम येथे आणि त्यानंतर औरंगाबाद येथे नोकरी केली होती. तो नऊ महिन्यांपूर्वी महाड एमआयडीसीत ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत नोकरीस लागला.
त्याचे वडील ट्रकचालक असून, आई गृहिणी आणि भाऊ सलीम शिक्षण घेत आहे. दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश पाटील-म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.





