Satara : कोयना पर्यटन विकास आराखडा सादर करावा

कोयनानगर : कोयना परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास संकुल अद्ययावत करावे. कोयना पर्यटन प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करून कोयना पर्यटन वाढीसाठी करावयाच्या कामासाठी आराखडा तातडीने सादर करावा,असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पर्यटन विभागाला दिले..
कोयना पर्यटन क्षेत्रात महामंडळाच्या पर्यटक निवासाला आधुनिक लूक देऊन ते अद्ययावत करण्यावर आपला भर असणार आहॆ. त्याचबरोबर पर्यटन विभागाकडून पर्यटन वाढीसाठी सुंदर आराखडा तयार करून कोयना पर्यटन सर्वांगसुंदर करावे,असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित त्याचबरोबर महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील सहभागी झाले होते. विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश शंभूराज देसाई यांनी दिले.
‘प्रतापगडची कामे पूर्ण करा’
देसाई म्हणाले की, महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने महाबळेश्वर परिसरातील विकास कामे गतीने करा. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी समन्वयातून पूर्ण करावीत. प्रतापगड किल्ल्याचे सुशोभिकरण करताना किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येईल अशी कामे करू नयेत. गुणवत्तापूर्ण कामावर भर द्यावा. पर्यटन महोत्सवाच्या अगोदर ही कामे पूर्ण करावीत. कोयनानगर पर्यटन प्रकल्पासाठी लवकरात लवकर सल्लागार नियुक्त करावा तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च आणि करावयाची सर्व कामाचा आराखडा सादर करा.





