Satara : कोरेगाव बाजार समितीने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील कोरेगावसह अन्य बाजार समितींचे कामकाज चांगले आहे, मात्र बाजार समितीने उत्पन्न वाढीचे उपक्रम हाती घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीने नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत, त्यास राज्य सरकार म्हणून निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांनी दिली.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमिपूजन मंत्री ना. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दुपारी सव्वा बारा वाजता झाले.
त्याप्रसंगी गीताई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर हे होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील, आ. शशिकांत शिंदे, समितीचे सभापती पांडूरंग भोसेले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, सहायक निबंधक प्रिती काळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कोरेगाव बाजार समितीला एकूण साडेनाऊ एकर जागा आहे. ही जागा मोठी असून याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. ही बाजार समिती आता ७५ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचेही कामकाज चांगल्या प्रकारे सुरु आहे. या दोन्ही संस्थाना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका राज्य सरकारची राहील, अशी ग्वाही सरकारचा प्रतिनिधी म्हणून देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव बाजार समितीने स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी समन्वय साधून आरक्षित व्यापारी संकुल इमारतीच्या जागेचा प्रश्न सोडवला पाहिजे. जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी या विषयात लक्ष घालावे आणि स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि बाजार समिती यांचे संयुक्त संकुल उभे राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून आ. नाईक निंबाळकर म्हणाले की, आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, बाजार समितीमार्फत उभारण्यात येणारे व्यापारी संकुल कोरेगावच्या वैभवात निश्चितपणे भर घालेल. या व्यापारी संकुलाचा शेतकरी, व्यापारी यांना नक्की फायदा होईल. या संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली जातील. त्याचबरोबर बाजार समितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे विविध स्त्रोत उपलब्ध करण्यात येतील, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
सभापती ॲड. पांडुरंग भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव संताजी यादव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक ॲड. अमोल राशिनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, संचालिका, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.





