सातारा – विकासात कोरेगाव मतदारसंघ देशपातळीवर अग्रेसर

कोरेगाव – कोरेगाव मतदारसंघ विकासात केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशपातळीवर सदैव अग्रेसर राहणार आहे. प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीत दर्जेदार विकासकामे सुरू आहेत. भोसे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
भोसे, ता. कोरेगाव ते भोसे फाटा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 20) झाला. त्याप्रसंगी आमदार शिंदे बोलत होते.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे, वसना वांगणा योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष हणमंतराव जगदाळे, कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण, माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, भाटमवाडीचे मोहनराव जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर पाणी प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेतून भाडळे खोर्याला पाणी जाणार आहे. ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या परिसरात एकही काम शिल्लक राहणार नाही, एवढा विकास नजीकच्या काळात केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी ठामपणे उभे राहावे. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शिंदे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.





