वडूज -जेथे एकीचे बळ, तिथे मिळते निश्चितच फळ याची प्रचिती राज्य शासनाने राबविलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत वडूज आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त योगदानामुळे खटाव तालुक्यातील बसस्थानके झाली चकाचक असेच म्हणावे लागेल. वडूज आगारांतर्गत मायणी, औंध, वडूज, पुसेसावळी बसस्थानक असून अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ही बसस्थानके चर्चेत असायची. वडूज आगारातील एसटी बसेसची दुरावस्था आणि कमतरता या कारणाने प्रवाशांसह राजकीय नेतेमंडळींच्या रोषाचे कारणही बनली. मात्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आशावादी रहात या अभियानाच्या निमित्ताने कंबर कसली आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना निस्वार्थीपणे कार्यरत राहून तालुक्यातील चार बसस्थानकांचा परिसर स्वच्छ ठेवला. यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अपेक्षित बदल स्वीकारले. रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, महिला शौचालय आदींची स्वच्छता आणि झाडा- झुडुपांचे उच्चाटन झाल्यामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न वाटते. हा आमुलाग्र बदल फक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त योगदानामुळे दिसून येत आहे. वडूजचे वाहतूक नियंत्रक नंदकुमार कुचेकर, औंधचे संतोष जाधव, बनाजी माळी, पुसेसावळीचे राजेश टंकसाळे, अजित पिसाळ, मायणीचे एन. एल. राक्षे, राहुल इनामदार आदींसोबत आगार प्रमुख बिस्मिल्ला सय्यद, भीमराव कांबळे, शुभम रणवरे, गणेश राऊत, विशाल लावंड, सुनील भिसे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने तालुक्यातील चार बसस्थानके कात टाकत आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे प्रवासी वर्गात मोठे समाधान व्यक्त होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाच्या विभागीय कामगार अधिकारी वृषाली डंगारे- बोटे, उपयंत्र अभियंता (चालन) सचिन पवार, पत्रकार प्रतिनिधी चंद्रशेखर जाधव, प्रवासी मित्र संभाजी इंगळे आदींनी या दरम्यान परीक्षण करून काही सूचना करत समाधान व्यक्त केले. तर औंध, वडूज, पुसेसावळी परिसरात केलेल्या वृक्षलागवडीची विशेष दखल घेतली. आगारातील त्रुटींची दखल… वडूज आगारातील एसटी बसेसच्या कमतरतेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे कोलमडलेले वेळापत्रक आणि बंद अवस्थेतील डिझेल पंपामुळे आगाराचे होणारे आर्थिक नुकसान या त्रुटींची परीक्षकांनी गंभीरपणे दखल घेतली आहे.