वाठार स्टेशन – चिलेवाडी, ता. कोरेगाव येथील प्रथमेश दत्तात्रय नलवडे यांच्या घराचे कुलूप तोडून, चोरट्यांनी चार तोळ्यांचे दागिने लंपास केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिलेवाडी येथील प्रथमेश दत्तात्रय नलवडे यांच्या वडिलांचा शुक्रवारी (दि. 9) रात्री 8 वाजता चिलेवाडीजवळ भाडळे चौकात अपघात झाला होता. प्रथमेशची आई बाहेरगावी गेली होती. त्यामुळे प्रथमेश घराला कुलूप लावून वडिलांना कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेला होता. या दरम्यान घराचे कुलूप तोडून, चोरट्यांनी घरातील पेटीमधील पर्समधून मणीमंगळसूत्र, तीनपदरी राणीहार, असे एक लाख 60 हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे दागिने लंपास केले. घरात चोरी झाल्याची घटना प्रथमेशच्या आजीने रविवारी सकाळी त्याला फोन करून सांगितली. याबाबत प्रथमेश नलवडे याने वाठार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव तपास करत आहेत.