Satara : छत्रपती शिवरायांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का?

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या अयोग्य आहे. मुंबईत राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? त्यामुळे राजभवनाच्या जागेपैकी 40 एकर जागा शिवस्मारकासाठी उपलब्ध करावी. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे शिवस्मारक शासनाने उभे केले पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर उदयनराजेनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन, राज्य शासनाला खडा सवाल केला. यावेळी रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, आप्पा तुपे आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने अनेक वर्षे राज्य आणि देशावर राज्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पक्षाची वाटचाल सुरू केली. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांकडेही सरकार असताना, खरे तर त्यांनीच शिवस्मारकाचा प्रश्न लावायला पाहिजे होता; परंतु तसे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रात निवडलेली जागा नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही. मुंबईसारख्या ठिकाणी राज्यपालांच्या नावावर राजभवनाची 48 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक झाले, तर ते योग्य ठरेल. यातील 40 एकर जागा शिवस्मारकासाठी आरक्षित करण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे समाजात एकी टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊनच त्यांनी घटना लिहिली. बहुजन समाजातील लोकांनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन, आपण आपले विचार व्यापक करत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे. महिला, लहान मुले, उपेक्षित समाज यांचा पूर्ण विचार करून, बाबासाहेबांनी अतिशय बारकाव्याने घटना लिहिली. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारच्या राजवाड्यात झाल्याचा मला विशेष अभिमान आहे.
लोकांनी कितीही डांगोरा पिटला, तरी संविधानाला धोका निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्यात ज्या घरामध्ये राहत होते, ते घर शासनाने लवकरच ताब्यात घ्यावे. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार आहे. सातारच्या राजवाड्याचेही संगोपन व्हावे, यासाठी हेरिटेज आर्किऑलॉजिकल विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. अशा वास्तू पुन्हा बांधून होणार नाहीत. त्यामुळे या संदर्भात शासनाने पावले उचलावीत.
समाज घडवण्यात महात्मा फुले, लहुजी वस्ताद यांचे योगदान मोठे आहे. त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांचाच आदर्श घेऊन, महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली, हे लक्षात घ्यायला हवे. महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी जी संपत्ती कमावली, ती लोकांसाठी खर्च केली. त्यामुळे त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही, असे मतही उदयनराजेंनी व्यक्त केले.
निळ्या शर्टची खास बात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी उदयनराजे भोसले यांनी निळा शर्ट परिधान केला होता. याबाबत विचारले असता, त्यांनी खास बात सांगितली. इंद्रधनुष्यात सात रंग असतात. त्यातला निळा रंग मला नेहमीच आवडतो. मनुष्य हा एकमेव धर्म आहे. जातपात करणार्यांना मनुष्यधर्म कसा लक्षात येईल? एखादा व्यक्तीचा अपघात झाला किंवा आजारी पडली आणि तिला रक्ताची गरज पडली, तर आपण जात पाहून रक्त घेतो का? त्यामुळे जातीयवाद थांबला नाही, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असेही उदयनराजेंनी सांगितले.
छत्रपती ताराराणींच्या समाधीसाठी केंद्राकडून निधी आणणार
संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. त्याबाबत विचारले असता, उदयनराजे म्हणाले, या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. या समाधीच्या कामासाठी लागणारा निधी केंद्राकडून मिळवू.





