फलटण – मराठा क्रांती मोर्चाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्या, दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात दुपारी 4 वाजता शोभायात्रेने होणार आहे.उद्घाटनानंतर 5.30 वाजता शिवशाहीर संतोष साळुंखे (लातूर) यांचा पोवाडा होणार आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील मार्गदर्शन करणार आहेत. येथील रिंग रोडवरील डी. एड्. चौकात स्वरा हाइटस्च्या बेसमेंटला गाळा नं. 2 मध्ये कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनास मराठा बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, फलटण तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे. मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळवून देण्यास मदत करणे, समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात येणार्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणे, समाजातील सुशिक्षित व बेरोजगारांना उद्योगांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणे, ही कामे या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा समन्वयक समाजातील नागरिकांना आमंत्रण देत आहेत.