Satara : शासकीय कामात अडथळा आणणार्यास कारावास

कराड : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शीतल गोरख काळे (रा. ओगलेवाडी, ता. कराड) याला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्या. दिलीप पतंगे यांनी मंगळवारी ही शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात 19 एप्रिल 2020 रोजी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. यावेळी होमगार्ड श्रीपाद विजय कुलकर्णी हे कोल्हापूर नाका येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना शीतल काळे हा तोंडाला मास्क न लावता तेथील एका वाईन शॉपमध्ये आला होता.
होमगार्ड श्रीपाद कुलकर्णी यांनी त्याला हटकले असता आरोपी शीतल काळे याने चिडून जाऊन होमगार्ड कुलकर्णी यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच शासकीय गणवेशावरील नेमप्लेट आणि बॅच तोडून मारहाण केली. या प्रकारानंतर पोलिसांसह इतरांनी शीतल काळे याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने रस्त्यावरील दगड उचलून तो पोलिसांच्या दिशेने भिरकावला.
याबाबत श्रीपाद विजय कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. आर. डी. परमार यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शीतल काळे याला दोन वर्ष सश्रम करावास तसेच 9 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा करावाच अशी शिक्षा सुनावली. पोलीस कॉन्स्टेबल सुरज भोसले यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.





