Satara: साताऱ्याच्या मातीतून मी निर्माण झालो

सातारा : माझी सगळी जडणघडण या सातारच्या मातीतून निर्माण झाली आहे. माझ्या गुरूंनी माझ्यावर योग्य संस्कार केले. माझ्या आईने, इथल्या नाट्य क्षेत्राने मला घडवलं. त्यामुळे इथपर्यंत प्रवास करता आला. वृक्ष आपल्याला खूप काही देतात. हे देणं आपण वृक्षांच्या लागवडीतून समाजाला परत करायला हवं. प्रत्येक माणसाने किमान 60 तरी वृक्ष लावायला हवेत, तरच पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगू शकेल, असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.
येथील साहित्य कला विकास प्रतिष्ठानच्यावतीने अभिनेते सयाजी शिंदे यांना ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्राचार्य अशोक भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचवेळी डॉ. शिवाजी शिंदे (सोलापूर) यांना संशोधक पुरस्कार व सूर्यकांत गुंजवटे यांना ग्रंथशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही. देशपांडे , कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, सुनिता कदम उपस्थित होते
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. अशोक भोईटे म्हणाले ‘लोकसाहित्यातून आणि लोकसंस्कृती मधून निर्माण झालेल्या साहित्य आणि कलावंत दोन्हीही संपन्न असतात. मातीतून निर्माण झालेले लोकसाहित्य हे माणसाला सजग बनवत असते. अभिनेते सयाजी शिंदे यांनी झुलवासारख्या नाटकांमधून सुरुवात करून 11 भाषेमध्ये अभिनयात आपली छाप उमटवली आहे. तरीसुद्धा स्वतःच्या मातीशी असणार नातं त्यांनी जपलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. समाजाप्रती आपलं काही देणं असतं या भूमिकेतून देवराई निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प खूप काही शिकवणारा आहे. सयाजी शिंदे ही सातारची शान आहे. ‘
डॉ. यशवंत पाटणे यांनी सयाजी शिंदे यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले व सातारच्या मातीतला हा एक हिरा आहे ज्याला खऱ्या अर्थाने समाजभान आहे. माणसाने गुरुजना प्रति आपले ऋण व्यक्त केले पाहिजे ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण यांच्या विद्यार्थ्यानी या प्रतिष्ठानची निर्मिती केली. त्यांच्या स्मृत्यर्थ गेले चोवीस वर्ष हे पुरस्कार प्रदान केले जातात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रदीप कांबळे यांनी डॉ. शिवाजी शिंदे यांच्या सन्मानपत्राचे वाचन करून त्यांचे मनोगत व्यक्त केले. सुनिता कदम यांनी सूर्यकांत गुंजवटे यांच्या सन्मानपत्राचे वाचन केले.
डॉ. राजेंद्र माने यांनी प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ कलावंत पुरस्कारा मागची साहित्य कलाविकास प्रतिष्ठान ची भूमिका स्पष्ट केली. आजपर्यंत लोककलाक्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंत, लेखक यांना ज्येष्ठ कलावंत पुरस्कार देऊन सन्मानित करून हे प्रतिष्ठान एक दृष्ट्या गौरवांकित झाले आहे असे मत व्यक्त केले
डॉ. शिवाजी शिंदे यांनी, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रति अभिवंदना व्यक्त केली. या प्रतिष्ठानने दिलेला पुरस्कार हा पुढील साहित्य कारकीर्दीला बळ देणारा ठरेल असे, मत व्यक्त केले. सूर्यकांत गुंजवटे यांनी प्रतिष्ठान प्रति ऋण व्यक्त करून त्यामुळे ग्रंथाविषयी पुढील चळवळीत काम करताना बळ मिळेल असे मत व्यक्त केले. डॉ. डी. व्ही. देशपांडे यांचाही प्रतिष्ठानच्यावतीने कवी मुक्तेश्वर यांच्यावर लिहिलेल्या प्रबंधाच्यासाठी सत्कार करण्यात आला.
सौ. स्मिता पोरे यांनी सुत्रसंचालन केले. सहकार्यवाह सुनिता कदम यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. अजय देशमुख, सचिन प्रभुणे, आनंदा ननावरे, गौतम भोसले, व रंगकर्मी उपस्थित होते.





