सातारा : मी निवडणुकीपुरता येत नसतो, मी इथलाच आहे

जावळीत येऊन आ. शशिकांत शिंदे यांचा आ. शिवेंद्रराजेंवर पलटवार
कुडाळ (प्रतिनिधी) – मी निवडणुकीपुरता जावळी तालुक्यात येत नसतो. जावळीच्या मातीशी माझी नाळ जोडली आहे. संपूर्ण सातारा जिल्हा हे माझे कार्यक्षेत्र आहे. मला कुणीही राजकारणात, समाजकारणात घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. माझ्या पाठीशी शरद पवारांचा आशीर्वाद आहे. जावळीत वातावरण चांगले होते म्हणून आतापर्यंत या तालुक्यात जास्त लक्ष दिले नव्हते; परंतु आता तालुक्यात यावे लागणार आहे. कोणता पत्ता कधी टाकायचा, हे मला माहिती आहे, असा पलटवार आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केला.
सर्जापूर ता. जावळी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता टीका केली होती. त्याला आ. शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले. कुडाळ, ता. जावळी येथील पिंपळ बन ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
खा. श्रीनिवास पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक कधी होईल, ते ठरेल तेव्हा ठरेल; परंतु लढणे माझ्या रक्तात आहे. लढाई कोणतीही असो, मी मागे हटत नाही.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जावळीच्या आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे गढूळ झाले आहे. या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या मातबर नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरला आहे.





