सातारा: हुंबरळी गाव पुनर्वसनाला गती; 236 कुटुंबांच्या सुरक्षित भविष्याचा पालकमंत्र्यांकडून रोडमॅप

कोयनानगर – पाटण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त हुंबरळी गावातील 236 कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सन 2023-24 मध्ये पुणे येथील भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार हुंबरळी गाव धोकादायक झोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारे गावकऱ्यांचे पुनर्वसन अत्यावश्यक असल्याचे मान्य करून सातारा येथील पालकमंत्री कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी अधिकारी उपस्थित होते.
पुनर्वसनासाठी जवळपासच्या दोन ते तीन किलोमीटर परिसरात शासकीय किंवा निमशासकीय जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले. अशा जागा उपलब्ध न झाल्यास प्रचलित नियमानुसार गावकऱ्यांच्या पसंतीनुसार खासगी जागा खरेदी करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसनाची प्रक्रिया लांबणीवर न टाकता तातडीने गती देण्यात यावी, असेही ते म्हणाले.
हुंबरळी गावाजवळील 1.07 द.ल.मी. क्षमतेचा पाझर तलाव हा काही प्रमाणात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात येतो. त्यामुळे या संदर्भात स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश देसाई यांनी दिले. मंत्रालय स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले. बैठकीत वांग–मराठवाडी प्रकल्प बाधितांच्या जमिनींचे वाटप आणि नागरी सुविधा यासंबंधी अडचणींचा आढावा घेण्यात आला. बाधित कुटुंबांना न्याय मिळावा आणि पुनर्वसन प्रक्रियेत कोणतीही विलंब नको, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी पर्यटन विभागामार्फत डिसेंबर–जानेवारी महिन्यात कोयना महोत्सव आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा महोत्सव भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.





