सातारा – साडेचार लाखांचा गुटखा सातारा शहरामध्ये जप्त
Updated On:

सातारा – येथील गुरुवार परज याठिकाणच्या गोडाऊनवर सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्ययामध्ये तब्बल 4 लाख 51 हजार 960 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी शाहीद सलीम सय्यद, जावेद सलीम सय्यद (दोघे रा. गुरुवार परज, सातारा) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवार परज येथे बंद खोलीत गुटखा साठवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री सातच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांचा छापा पडल्याचे समजताच परिसरात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांची ही कारवाई सुमारे अडीच तास सुरू होती. अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांच्या उपस्थितीत जप्त मालाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर बंद खोलीत पोत्यांमध्ये गुटखा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तो गुटखा जप्त केला.





