बोरगाव पोलीसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना नागठाणे – पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अतित (ता. सातारा) बस स्थानकासमोर एका गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या नॉबमधून गळती सुरू झाली होती. याची माहिती मिळाल्यावर बोरगाव पोलीसांनी आवश्यक खबरदारी घेतल्याने दुर्घटना टळली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीप्रमाणे दि. १८ रोजी साडेबाराच्या दरम्यान महामार्गावरून गॅस वाहतुक करणारा टॅंकर (केए ०१ एएच ०४१०) कराड बाजूकडे निघाला होता. तो अतीत बसस्थानकासमोर आला. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या गतीरोधकावर बंद पडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक खोळंबली. याबाबत डायल ११२ ला कॉलवरून बाेरगाव पोलीस ठाण्यास ही माहिती मिळाली. तो पर्यंत वाहतूक खोळंबल्याने टॅंकर मार्गातून हटवण्यासाठी हायड्रा क्रेन महामार्ग ठेकेदाराने पाठवली. त्या क्रेनने टॅंकर बाजूला करताना टॅंकरच्या नॉबची बाजू क्रेनवर आदळली. त्यामुळे त्या नॉबमधून गॅसची गळती सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटना स्थळावर कॉ. सतिश पवार पोहोचले. त्यांनी पाहणी करून पोलीस ठाण्यास माहिती कळविली. गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि तेलतुंबडे, पीएसआय स्मिता पाटील, राजाराम निकम व कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काळजीपूर्वक टॅंकर बसस्थानकासमोरील मैदानात नेला व वाहतुक सुरळीत केली. दुर्घटना होऊ नये यासाठी परिसरातील नागरिकांना योग्य त्या सूचनाही केल्या. सध्या नॉबमधून बाहेर पडणाऱ्या गॅसची गळती बंद करण्यासाठी व टॅंकर अधिक सुरक्षित ठिकाणी नेण्याचे बोरगाव पोलिसांचे प्रयत्न सुरुच असल्याचे समजते.