Satara : येरळवाडीत ज्वारीच्या शेतात गांजा; एकाला अटक

सातारा – येरळवाडी (ता.खटाव) येथील रानमळा नावाच्या शिवारात ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याने वडूज पोलिसांनी कारवाई करून बाबासो गंगाराम जाधव यांना ताब्यात घेतले आहे. जाधव यांच्या शेतातून 70 हजार रुपये किमतीची गांजाची रोपे जप्त करण्यात आली आहेत.
येरळवाडी गावच्या हद्दीत रानमळा नावाच्या शिवारात बाबासो गंगाराम जाधव यांनी त्यांच्या ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शहाणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
मिळालेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांच्या टीमने घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता, ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारवाई पथकातील पोलिसांमलदार यांनी ज्वारीच्या पिकातील गांजाची सर्व रोपे बाहेर काढून त्याची मोजनी केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 70 हजार रुपये किमतीचा पावणे पाच किलो गांजा जप्त केला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, सचिन भिलारी, अंमलदार शिवाजी खाडे, सत्यवान खाडे ,नवनाथ शिरकुळे, दऱ्याबा नरळे, पुष्कर जाधव, जयदीप लवळे,गजानन वाघमारे,चालक किरण चव्हाण यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत.





