Satara Fruit Market : मोठ्या फळ विक्रेत्यांची मुजोरी! डोंगरदऱ्यांतून रानमेवा आणणारे गोरगरीब विक्रेते मात्र वाऱ्यावर
Satara Fruit Market : मोती चौक आणि राजवाडा परिसरात कोट्यवधींच्या सुविधा असूनही रस्त्यांवरच दुकाने; वाहतूक कोंडीमुळे सातारकर त्रस्त.

Satara Fruit Market – येथील राजवाडा परिसरात उन्हाळ्याच्या दिवसांत एक विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले फ्रूट मार्केट असूनही अनेक व्यावसायिक फळ विक्रेते तिथे व्यवसाय करण्याऐवजी रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. दुसऱ्या बाजूला डोंगरदऱ्यांतून रानमेवा गोळा करून शहरात आणणारे गोरगरीब विक्रेते मात्र उन्हात, धुळीत आणि असुरक्षित परिस्थितीत दिवस काढत आहेत.
सातारा तालुक्याच्या डोंगरदर्यातून येणाऱ्या रानमेवा विक्रेत्यांना फ्रूट मार्केटमध्ये हंगामी स्वरूपाची जागा मिळावी अशी मागणी होत आहे. मोती चौक ते राजवाडा या परिसरातील फूटपाथ आणि रस्ते अनेक वर्षांपासून काही फळ विक्रेत्यांनी व्यापल्याचे चित्र आहे. फ्रूट मार्केटची सुविधा उपलब्ध असतानाही तिथे जाण्यास नकार देत हे विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतात. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, पादचाऱ्यांची गैरसोय होते आणि परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढते.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही यावर ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गावठी आंबे, रायवळ, करवंदे, जांभळे आणि विविध रानमेवा विकणारे विक्रेते या व्यवस्थेचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. पहाटेपासून जंगल, डोंगर आणि रानावनातून मेवा गोळा करून शहरात आणणाऱ्या या विक्रेत्यांना बसण्यासाठी निश्चित जागा मिळत नाही.
उलट रस्त्यावरील प्रभावशाली विक्रेत्यांकडून त्यांना हटकले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. विशेषतः मोती चौक आणि गोल बाग परिसरामध्ये अशा स्वरूपाच्या वादावादी वारंवार पाहायला मिळत आहेत. मोठे व्यापारी आणि अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा धाक नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ज्यांच्यासाठी फ्रूट मार्केट उभारण्यात आले, तेच रस्त्यावर व्यवसाय करत असताना प्रशासन मौन का बाळगते, असा सवाल उपस्थित होत आहे.





