Radhika Road Satara : नगरपालिकेचा मोठा अॅक्शन प्लॅन! राधिका रस्त्यावरील अतिक्रमणांवर फिरणार बुलडोझर
Radhika Road Satara : अव्यवस्थित पार्किंग, निकृष्ट डांबरीकरण आणि खड्ड्यांमुळे वाढले होते अपघात; सातारा पालिकेच्या धडक मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले.

Radhika Road Satara – समर्थ मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरणात येणारी पक्की अतिक्रमणे हटविल्यानंतर सातारा नगरपालिकेने आता शहरातील अत्यंत वर्दळीच्या राधिका रस्त्यावरील (माजी राज्यपाल गणपतराव तपासे पथ) अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (दि. ८) बुधवार चौक (बारटक्के कॉर्नर) ते महाराणा प्रताप चौक या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणधारकांवरही समान निकष लावले जातात का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी ही मोहीम निष्पक्षपणे राबविण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता वर्षानुवर्षे अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला असताना प्रशासनाने यापूर्वीच ही कारवाई करायला हवी होती.
समर्थ मंदिर परिसरातील मोहिमेनंतर आता राधिका रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम होत आहे. स्थानिक पातळीवर काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींच्या आश्रयामुळेच अनेक अतिक्रमणे या रस्त्यावर फोफावली आणि रस्त्याची मूळ रुंदीच कमी झाली, अशी चर्चा शहरात रंगली आहे. विशेष म्हणजे सातारा शहरातील स्वयंघोषित ट्रक टर्मिनस म्हणून ओळख निर्माण झालेल्या या मार्गावर मोठ्या वाहनांची सततची वर्दळ असते.
त्यातच रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे, अव्यवस्थित पार्किंग आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडूनही प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रस्त्याचे डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार वारंवार होत असून खड्डे, उखडलेला रस्ता आणि अतिक्रमणांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
त्यामुळे आता केवळ कारवाईची घोषणा न करता प्रत्यक्षात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची गरज व्यक्त होत आहे. समर्थ मंदिर परिसरात कारवाई करून प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी राधिका रस्त्यावरील कारवाई ही खऱ्या अर्थाने सातारा नगरपालिकेच्या इच्छाशक्तीची परीक्षा ठरणार आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणधारकांवरही समान निकष लावले जातात का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






