पुसेसावळी : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूषणगडाच्या विकासासाठी मागणी केलेली सर्व कामे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हिंदुत्ववादी आमदार म्हणून तुमच्या सर्व अडचणी विधानसभेत मांडणार आहे,’’ अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. खटाव तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले श्री भूषणगड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खटाव-माण व टीम भूषणगड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक तिथीनुसार हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजी नामदेव गुजर (भोसरे), वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, वेताळ भक्त दादा महाराज (गोरेगाव वांगी), कदमवाडीचे रमेश महाराज, रॉयल कारभार ग्रुप अध्यक्ष सौरभ दादा जाधव, संपर्क प्रमुख सुरज दादा पाटोळे, श्रीकांत पिसाळ, अनिल पिसाळ, धोंडीराम जगताप, सुधीर माने आदी या सोहळ्यास उपस्थित होते. गड परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या जयघोषांनी दणाणून गेला होता. फटाक्यांची आतषबाजी, हलगी, तुतारी, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, देशभक्तीपर गीते, श्लोक यांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, ‘‘शिवराज्याभिषेक दिन रयतेचा आनंदोत्सव, स्वराज्य, स्वाभिमान व स्वातंत्र्य यांचा सन्मान करणारा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा हा दिवस आहे.’’ याप्रसंगी शिवव्याख्याते गुरुराज रसाळ यांचे व्याख्यान झाले. तसेच वडूज ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गडाची स्वच्छता व सुशोभीकरण करून कार्यक्रमपूर्व तयारी करण्यात आली होती. पूर्वसंध्येला आई हरणाई देवीच्या गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, मशालोत्सव साजरा करत गड उजळून टाकण्यात आला होता. शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नितीन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मानसिंग कदम यांनी आभार मानले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.