Satara : फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले भाजपमध्ये

कोळकी : फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते.
दिलीपसिंह भोसले म्हणाले, फलटण शहर एक आयडॉल शहर व्हावे, अशी माझी मनोमन इच्छा असून हे होण्यासाठी सक्षम पक्षाची व विकासात्मक नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन आपण आज भाजप पक्षात प्रवेश करीत आहोत.
पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांनाच सन्मानजनक वागणूक मिळेल, असे सांगून फलटण शहर सुंदर व समस्या मुक्त होण्यासाठी आपण निश्चित सहकार्य करू अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. याप्रसंगी सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संचालक कर्मचारी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरामध्ये राजे गटाला मोठा धक्का
दिलीपसिंह भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे राजे गटाला शहरामध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांनी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद, नगरसेवक, विरोधी पक्षनेतेपद आदी पदे भूषविली असून त्यांच्या कारकिर्दीत सांस्कृतिक भवन, नगरपरिषद शाळा, बांधकाम, जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकेत वर्ग आदी उठावदार कामे आज ही फलटणकरांच्या लक्षात आहेत.





