सातारा | आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये अलमास मुलाणींचा झेंडा

नागठाणे – पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या अलमास मुलाणी यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली अत्यंत प्रतिष्ठेची कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. जगातील सर्वात खडतर अन् जुनी अल्ट्रामॅरेथॉन म्हणून ओळखली जाणारी सुमारे 88 किलोमीटरची ही स्पर्धा त्यांनी 11 तासांत यशस्वी केली. त्यात त्यांनी देशातील पहिल्या पाच महिला स्पर्धकांत येण्याचा मान मिळविला.
अलमास मुलाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मॅरेथॉनकडे वळल्या. त्यात प्राविण्य संपादन करताना आतापर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धांत त्यांनी यश पटकाविले आहे. सलग 72 किलोमीटर धावणे, सलग 73 किलोमीटर सायकलिंगची किमयाही त्यांनी साधली आहे. आयर्न वुमनचा बहुमानही त्यांनी पूर्ण केला आहे. पोहणे क्रीडा प्रकारातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. यासाठी त्यांना लोणंदचे आयर्नमन मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच शिक्षक बँकेचे संचालक विशाल कणसे, वैशाली जाधव, वैशाली गुरव, नीलेश माने, अखिल सय्यद आदींची सहकार्य त्यांना लाभले. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
“कॉम्रेडस मॅरेथॉनसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणे हे माझे स्वप्न होते. ते पुरे झाल्याचा आनंद अन् अभिमान वाटतो. आजवर केलेल्या कष्ट, मेहनतीचेच हे फळ आहे.”
– अलमास मुलाणी
कॉम्रेडस मॅरेथॉनविषयी…
कॉम्रेडस मॅरेथॉन सुमारे 88 किलोमीटर अंतराची अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धा. ती दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू नाताळ प्रांतात आयोजिण्यात येते. डर्बन ते पीटरमॅरिटझबर्ग शहरांदरम्यान या शर्यतीचा मार्ग आहे. ही जगातील सर्वात मोठी अन् सर्वात जुनी अल्ट्रामॅरेथॉन शर्यत म्हणून ओळखली जाते. जगभरातील 132 देशांचे स्पर्धक त्यात सहभागी झाले होते.





