Satara : कृषी विभाग योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

सातारा : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारासाठी सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून दि. १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी www.zpsatarascheme.com या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केले आहे.
कृषी यांत्रिकीकरण, पेरणी यंत्र, पाचटकुट्टी, खोडवा कटर, पल्टी नांगर, पॉवर विडर, २ एचपी विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्र, कॅन्व्हास, एचडीपीई ताडपत्री, ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह, ५ व ७.५ हॉर्स पॉवर विद्युत पंपसंच, ३ हॉर्स पॉवर विद्युत पंप संच, एचडीपीई पाईप (६३ एमएम, ७५ एमएम, ९० एमएम) किंवा पीव्हीसी पाईप (७५ एमएम, ९० एमएम), मधपेटी या योजनेसाठी ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांच्या आतील सातबारा व खातेउतारा, आधारकार्ड सत्यप्रत, रेशनकार्ड सत्यप्रत, बँक पासबुक राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँक, छोटे कुटुंब प्रमाणपत्र, कडबाकुट्टी पशुधन विकास अधिकारी यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला व घरगुती विद्युत बिल, पाइप व विद्युत पंप संचासाठी सात बारावर विहीर नोंद नसेल तर पाणी परवाना जोडण्यास हरकत नाही व विद्युत बिल, कृषी यांत्रिकीकरण, औजारासाठी ट्रॅक्टरचे आरसीबुक सत्यप्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
इच्छुक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत सर्व कागदपत्रे जोडून ऑनलाइन अर्ज सादर करावेत व कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वास सिद यांनी केले आहे.





