Satara : बोरगाव येथे 84 लाखांची बनावट दारू व ट्रक जप्त

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर बोरगाव, ता. सातारा येथे मंगळवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गोवा राज्यातील एक कोटी 91 लाख रुपये किमतीची बनावट दारू जप्त केली. याप्रकरणी सचिन विजय जाधव (रा. अळसंद, ता. खानापूर, जि. सांगली) आणि जमीर हरूण पटेल (रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
एका ट्रकमधून बनावट दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाला कारवाईची सूचना दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, बोरगाव पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उरमोडी नदीपात्राजवळ मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता सापळा रचला.
हा ट्रक टप्प्यात आल्यावर पोलिसांनी तो अडवून, त्याची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशल माल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या 84 लाख 41 हजार 40 बनावट विदेशी दारूचा साठा आढळला. या कारवाईमध्ये साडेसहा लाख रुपये किमतीच्या ट्रकसह एक कोटी 91 लाख 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि रोहित फाळके, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, विश्वास शिंगाडे, विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, रोहित शिंदे, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, राजू कांबळे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रवीण कांबळे, ओंकार यादव, रविराज वर्णेकर, धीरज महाडिक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, संभाजी साळुंखे यांनी ही कारवाई केली.





