सातारा – सकल मराठा समाजाचा कराडमध्ये सोमवारी एल्गार

कराड -मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलने केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला जात असून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड तालुका सकल मराठा मोर्चा समाजाच्यावतीने सोमवार, दि. 30 रोजी येथील तहसील कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता दत्त चौकातून या मोर्चाला सुरूवात होणार आहे.
कोल्हापूर नाका येथील सोनाई मंगल कार्यालयात शुक्रवारी कराड तालुका सकल मराठा मोर्चा समितीची बैठक पार पडली. कराड तालुक्यातील सकल समाजाच्यावतीने कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघातून सर्व गावांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चात संपूर्ण कुटुंबासह मराठा समाजाने सहभागी होवून शासनाला जाग आणावी.
यासाठी कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनास निवेदन देण्यात येणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कराड शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कराड तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी प्रभातफेरी काढून जनजागृती केली जात आहे. आता कराड तालुक्यातील मराठा समाजाचा आवाज शासनाला आणि सरकारला गेला पाहिजे, यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चाला येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था
तांबवे, सुपने, उंब्रज, वहागाव, तळबीड, चरेगाव येथून येणाऱ्या मराठा बांधवांनी दैत्य निवारणी मंदिर परिसरात वाहने पार्किंग करावी. विंग, कोळे, चचेगाव, येरवळे या ठिकाणाहून येणाऱ्यांनी पंकज हॉटेल पाठिमागे वाहने पार्किंग करावीत. काले, उंडाळे, ओंड, आटके, रेठरे, वाठार या परिसरातून येणाऱ्या बांधवांनी पी. डी. पाटील उद्यान परिसरात वाहने पार्किंग करावीत. वडगाव, शेरे, शेणोली, कार्वे, खुबी या परिसरातून येणाऱ्यांनी बाजार समिती – भेदा चौक परिसरात वाहने पार्किंग करावीत. तर करवडी, ओगलेवाडी, मसूर, कोपर्डे, अंतवडी, शामगाव, किवळ, शिरवडे परिसरातील बांधवांनी शिवाजी हायस्कूल – शिवाजी स्टेडियम परिसरात वाहने पार्किंग करावीत.
असा असेल मोर्चाचा मार्ग
सकल मराठा समाजाने सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील दत्त चौक येथे एकत्रित यायचे आहे. तेथून दत्त चौक – चावडी चौक – जोतिबा मंदिर – आंबेडकर पुतळा – शासकीय उपजिल्हा रुग्णालय – विजय दिवस चौक – कराड बसस्थानक – दत्त चौक, तेथून पुढे कराड तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे.
============





