सातारा -जिल्ह्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुणवेत्तेनुसार व पारदर्शकपणे पार पाडा. विहित क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नका, नियमापेक्षा जास्त फी घेऊ नका, करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करुन प्रवेश प्रक्रिया राबवा, अशा सूचना शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या.
कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 105 प्राचार्यांची ऑनलाइन बैठक बुधवारी झाली. याप्रसंगी कोळेकर बोलत होत्या. करोनामुळे प्रवेशासाठी गर्दी होऊ नये म्हणून प्रवेशासाठी आवश्यक त्या प्रमाणात कक्ष स्थापन करावेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याकामी विशेष भरारी पथक कनिष्ठ महाविद्यालयास अचानक भेट देणार असल्याचे कोळेकर यांनी सांगितले. मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वसंरक्षणाचे ऑनलाइन प्रशिक्षण पोलीस विभागामार्फत सर्व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानिक व समांतर आरक्षणानुसार विद्यार्थ्याच्या गुणवत्ता याद्या पारदर्शकपणे तयार कराव्यात. प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतची लिंक तयार करावी, प्रथम अनुदानित तुकडीत व त्यानंतर विनाअनुदानित व स्वंयअर्थसहाय्यता तुकड्यांमध्ये प्रवेश द्यावा, अशा सूचना उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे यांनी दिल्या. या बैठकीस उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पाटील, जिल्हा सचिव एन. टी. निकम उपस्थित होते. ही ऑनलाइन बैठक पार पाडण्यासाठी ग्यान प्रकाश फॉडेशनचे प्रशांत भोसले यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे विषय तज्ज्ञ किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
अशी होणार प्रवेश प्रक्रिया
माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक साईनाथ वाळेकर यांनी प्रवेशप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार दि. 18 ते 23 ऑगस्टअखेर प्रवेश फॉर्म देणे व स्वीकारणे, दि. 24 ते 26 ऑगस्ट प्रवेश अर्जाची छाननी व तपासणी करुन निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करणे, दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकावर जाहीर करण्यात येणार आहे. दि. 28 ते 1 सप्टेंबरअखेर निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, दि. 2 ते 3 सप्टेंबरअखेर प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, दि. 4 ते 6 सप्टेंबर तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे. दि. 7 सप्टेंबरपासून 11 वी वर्ग ऑनलाइन पध्दतीने सुरू करण्यात येणार आहेत. शासनाचे पुढील आदेश आल्यावरच प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याबाबतच्या सूचना देण्यात येणार आहेत.