Satara Election: गॅझेट प्रसिद्धीनंतर नगराध्यक्ष लवकरच स्वीकारणार पदभार; आता उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

प्रभात वृत्तसेवा
सातारा : तब्बल नऊ वर्षाच्या कालखंडानंतर सातारा नगरपालिकेला अमोल मोहिते यांच्या रूपाने पुढील नगराध्यक्ष मिळाला आहे. यंदा भाजपचे कमळ चिन्ह प्रथमच पालिकेत फुलले असून आता पालिकेत पक्ष सूचनेनुसार कारभार चालणार आहे. गॅझेट प्रसिद्धीनंतर लवकरच नगराध्यक्ष मोहिते पदभार स्वीकारणार असून आगामी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी विशेष सभेची प्रतीक्षा असणार आहे.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा आता तब्बल साडेतीन वर्षांनी होणार असून या निवडीमध्ये मागील सभेचा इतिवृत्तांत तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर करण्यासाठी विशेषसभा बोलवावी लागणार आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते हे तब्बल 42 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आले.
राज्यांमध्ये हे मताधिक्य एक मोठा विक्रम मानला गेला आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर नगर प्रशासनाचे कर्मचारी जिल्ह्यातील 11 नगरसेवकांच्या गॅझेट प्रसिद्धीसाठी पुण्याला रवाना झाले आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये अमोल मोहिते सातारा पालिकेत येऊन पदभार स्वीकारणार आहेत.
स्वीकृत सह उपनगराध्यक्ष पदाची राहणार उत्सुकता?
नगराध्यक्ष मोहिते यांच्या जोडीला उपनगराध्यक्ष म्हणून कोण येणार? हा खरा उत्सुकतेचा विषय आहे. अर्थातच या पदावर खा. उदयनराजे समर्थकांपैकी कोणाला तरी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये बनकर, शेंडे, पाटील, आहेरराव यापैकी कोणालाही संधी दिली जाऊ शकते. अर्थातच उदयनराजे यांच्या सहमती नंतरच पुढील प्रक्रियांना गती मिळणार आहे.
या धोरणात्मक विषयांवर सर्वसंमतीने चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. सातारा पालिकेत 50 नगरसेवक असून एक दशांश याप्रमाणे पाच स्वीकृत नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे या पदांवर कोणाला संधी मिळणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
नवीन सभागृह, नव्या-जुन्या चेहर्यांचा समावेश
सातारा पालिकेचे आगामी सर्वसाधारण सभागृह हे नव्या जुन्या चेहर्यांच्या समावेश असणारे आहे. यामध्ये एकीकडे अविनाश कदम, जयवंत भोसले, एड. दत्ता बनकर, मनोज शेंडे, निशांत पाटील, अशोक शेडगे, सुजाता राजेमहाडिक, बाळासाहेब खंदारे यांसारखे अनुभवी चेहरे निवडून आलेले असताना
दुसरीकडे फिरोज पठाण, विश्वतेज बालगुडे, विजय देसाई, रविराज किर्दत, दिलीप म्हेत्रे, सुशांत महाजन, हेमलता भोसले, सागर पावशे यांसारखे नवीन चेहरे सुद्धा निवडून आले आहेत. त्यामुळे हे सभागृह म्हणजे जुने अनुभवी आणि नवीन उत्साही अशा नगरसेवकांचा भरणा असलेले सभागृह असणार आहे.





