Satara : वटवृक्ष पुजनाला निघालेल्या महिलेचे आठ तोळ्याचे दागिने लंपास

कराड : वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्याचे गंठण धुमस्टाईल चोरट्यांनी लंपास केले. गोळेश्वर, ता. कराड येथील कदम वस्तीत मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत रूपा संदीप कदम यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळेश्वर येथील कदम वस्तीत राहणार्या रूपा कदम या मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघाल्या होत्या. मोठी जाऊ कविता कदम या पूजेसाठी येणार असल्यामुळे रूपा कदम त्यांना बोलविण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाल्या होत्या.
रूपा कदम या चालत जात असताना दुचाकीवरून दोघेजण त्यांच्या पाठीमागून आले. काही अंतर पुढे गेल्यानंतर ते परत माघारी फिरले. रूपा कदम या जावेला बोलविण्यासाठी हाका मारीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले.
रूपा कदम यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. चोरट्यांनी रूपा कदम यांच्या गळ्यातील 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळा वजनाचे गंठण आणि 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मिनीगंठण लंपास केले.





