Satara : महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण होण्यामध्ये साताऱ्यातील दाभोलकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच दाभोळकर विचाराचा वेध घेतात, घटनांचा कार्यकारणभाव तपासतात आणि त्यातील संगती- विसंगती यांचे विश्लेषण व अन्वेषण करतात. दाभोळकर बंधू- भगिनींनी शिक्षणाच्या, शेतीच्या, सामाजिक सुधारणांच्या व नवोन्मेशाच्या क्षेत्रामध्ये केलेले काम अतुलनीय आहे, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले. येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयातील सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात पुणे येथील साधना प्रकाशनाच्यावतीने आणि भानू काळे व डॉ.अनिल जोशी यांनी संपादित केलेल्या ‘१५५ सदाशिव पेठ, सातारा’ या पुस्तकाच्या प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. लेखक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता दामोदर नायक अध्यक्षस्थानी होते. दत्ता नायक म्हणाले, ‘दाभोलकर कुटुंबातील दुसरी व तिसरी पिढीही विविध क्षेत्रांत कर्तबगारी दाखवत आहे, अशा प्रकारची घराणेशाही समाजविकासाला उपकारकच आहे.’ आई ताराबाई ही त्यांच्या घराची केंद्रबिंदू होती आणि तिने सर्व मुलामुलींना स्वतंत्र वृत्तीनें वाढू दिले हे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी काही उदाहरणांसह सांगितले. Pune District : पाणीटंचाईवर समर्थ फाउंडेशनचा दिलासा; मोफत टँकर सेवेचा ग्रामस्थांना आधार डॉ. नरेंद्र यांच्याशी विवाह होऊन दाभोलकर कुटुंबात आलेल्या डॉ. शैला यांनी सासूबाईंच्या म्हणजे माईंच्या व्यक्तिमत्वात भावना व विचार यांचा संगम असल्याचे आठवणीसह सांगितले. डॉ. चित्रा दाभोलकर यांनी दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने देण्यात येणाऱ्या दोन कोटी रुपये मदतीविषयीचे निवेदन वाचून दाखवले. मदत करण्यासाठी संस्थेची अंतिम निवड करण्यासाठी एक निवड समितीही तयार केली असल्याचे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले. साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही संपादकांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका मांडली. दाभोलकर कुटुंबाचे वेगळेपण शिरीष चिटणीस यांनी सांगितले. प्राचार्य अरुण आंधळे यांनी स्वागत केले. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले. ‘१५५, सदाशव पेठ’मधील जडणघडण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अच्युत व तारा दाभोलकर या दाम्पत्याला 1919 ते 45 या काळात दहा अपत्ये (सात मुले व तीन मुली ) झाली आणि अच्युतरावांच्या भावाच्या दोन मुलीही त्यांच्याकडेच होत्या. अशी ही बारा भावंडे साताऱ्यातील ‘१५५, सदाशिव पेठ’ या घरात लहानाचे मोठी झाली. पुढे सर्वजण उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून आदर्श कामकाज केले. सर्वांत मोठे देवदत्त यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले तर सर्वांत धाकटे नरेंद्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते व साधना साप्ताहिकाचे संपादक होते. उर्वरित भावंडे प्राध्यापक, डॉक्टर, वैज्ञानिक झाले. या दहा भावंडांपैकी आता केवळ दत्तप्रसाद दाभोळकर हयात आहेत. बारा भावंडांच्या कर्तृत्त्वाचा आलेख या पुस्तकात 18 व्यक्तींनी लिहिलेले एकूण 28 लेख आहेत. त्यात दत्तप्रसाद यांचे सात लेख आहेत. देवदत्त, नरेंद्र, कुंदा, अमरजा या भावंडांनी लिहिलेले लेखही आहेत. याशिवाय अतीश दाभोलकर यांनी वडील श्रीपाद यांच्याविषयी, अनंत दाभोलकर यांनी वडील नरसिंह यांच्याविषयी, प्रवीण नेरुरकर यांनी आई अमरजा यांच्याविषयी लिहिलेले लेख आहेत. अन्य सुहृदांचे लेखही आहेत. भानू काळे म्हणाले, ‘‘लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबातील सर्व भावंडांच्या कामाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे एकत्रित असे चित्रण पूर्वी कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. आपल्या सामाजिक इतिहासातील ही उणीव भावी पिढ्यांसाठी भरून काढणे ही हे पुस्तक संपादित करण्यामागची भूमिका होती.’ डॉ. अनिल जोशी म्हणाले, ‘भारतीय विचारविश्वाच्या केंद्रस्थानी राहिलेली कुटुंब व्यवस्था समजावून घेण्याची आवश्यकता असताना हे पुस्तक म्हणजे केवळ त्या बारा भावंडांच्या कर्तृत्वाचा आलेख नसून, दाभोलकर कुटुंबाचा महत्तम साधारण विभाजक आहे. शिवाय, 1920 नंतरच्या शतकी कालखंडाचे काही चित्रणही यात दिसते.’ Karad News : गॅस एजन्सीला कुलूप लावण्याचा मसूर ग्रामसभेत इशारा