Karad News : मसूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध ज्वलंत प्रश्नांवरुन अक्षरशः रणांगण ठरली. इंडेन गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारावर संतप्त ग्रामस्थांनी गॅस वितरक रणजित जाधव यांना प्रश्नांचा भडीमार करत निरुत्तर केले. यापुढे ग्राहकांना विनातक्रार गॅस पुरवठा झाला नाही, तर एजन्सीला कुलूप ठोकून ग्राहकांना दुसर्या एजन्सीकडे वर्ग करण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे पुरवठा अधिकार्यांना ग्रामसभेसाठी निमंत्रण देऊनही ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. तसेच इंडेन गॅसच्या प्रश्नावर सोमवारी दि. 25 रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक ए. टी. बर्गे होते. यावेळी माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, बाळासाहेब जगदाळे, सह्याद्रीचे संचालक दिनकर शिरतोडे, गॅस वितरक रणजित जाधव, जलजीवन योजनेचे अधिकारी पाटील- क्षीरसागर, महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. कादर पिरजादे, पवन निकम, तलाठी दंडवते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कडस, वैद्यकीय अधिकारी डॉ. मैथिली मिरजे, मसूर पोलीस ठाण्याचे सुनील पन्हाळे, पोलीस पाटील तिलोत्तमा वेल्हाळ, लायन्स क्लबचे डॉ. रमेश लोखंडे, जागरूक ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गॅस टंचाई, घरपोच सेवेचा अभाव, 45 दिवसांच्या कथित नियमाचा गोंधळ आणि ग्राहकांची होत असलेली आर्थिक व मानसिक पिळवणूक यावरून संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत एजन्सीला चांगलेच धारेवर धरले. जिल्हाभर गॅस सेवा सुरळीत सुरु असताना मसूरमध्येच टंचाई का? 45 दिवसांचा शासन आदेश कुठे आहे? अधिकृत परिपत्रक दाखवा, असा प्रश्न उपस्थित होताच गॅस वितरकांची बोलतीच बंद झाली. ग्राहकांना 45 दिवसांनंतरही तब्बल 55 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने मधल्या काळातील सिलेंडर नेमके कुठे जातात, असा आरोप ग्रामस्थांनी केला. मात्र, यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. ग्रामसभेत बहुचर्चित ठरलेल्या एका राजकीय गाळ्याच्या ताब्यावरूनही जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. वातावरण इतके तापले की बाब हमरी-तुमरीवर येऊन फुकटच्या खाण्यापर्यंत पोहोचली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने संभाव्य अनर्थ टळला. पणन महामंडळाच्या गाळ्यांबाबत पवन निकम यांनी केलेल्या अर्जाचे वाचन होताच या विषयावर पुन्हा एकदा जोरदार वादंग झाले. Vishwajeet Kadam : राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली; डॉ. विश्वजित कदम यांची टीका संबंधित गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्याचे आश्वासन प्रसासकांनी दिले. वाढीव घरपट्टी व बेकायदेशीर दंड आकारणीवरूनही प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दंड कमी केला नाही तर घरपट्टी भरणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. आरफळ वसाहतीचा 8- अ उतारा ग्रामपंचायतीच्या मालकीचा असताना तेथील कर आकारणी का होत नाही? पोलीस ठाणे ग्रामपंचायतीच्या जागेत असताना त्याचे भाडे पाटबंधारे विभाग का वसूल करतो, असा सवाल उपस्थित करत ग्रामपंचायत महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार या जागेचा ताबा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जलजीवन योजनेचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून वीज कनेक्शन मिळताच योजना सुरू होईल. तसेच खडकपेट पोस्ट गल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण आठ दिवसांत करण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले. माझे गाव- आरोग्यसंपन्न गाव या संकल्पनेत लोकसहभागाचे आवाहन यावेळी डॉ. मैथिली मिरजे यांनी केले. मसूर येथे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. दोन टप्प्यांतील जनगणनेबाबत तलाठी दंडवते यांनी माहिती दिली. शेतकर्यांना दिवसा वीज द्यावी, गावातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू कराव्यात व कायमस्वरुपी वायरमन नेमावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मागासवर्गीय स्मशानभूमीच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करत 15 टक्के मागासवर्गीय निधी नेमका कुठे खर्च झाला? दिव्यांग निधीचा लाभ कोणाला दिला? व वार्षिक जमाखर्चाच्या तपशीलाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. गावाला पाणीपुरवठा करणार्या टाकीत कबुतरे मृतावस्थेत पडल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सभागृहात दाखवत प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे ग्रामसभेत एकच खळबळ उडाली. ग्रामसभेत मानसिंगराव जगदाळे, पवन निकम, प्रा. कादर पिरजादे, संभाजी बर्गे ,प्रकाश जाधव, संजय शिरतोडे, सुनील दळवी ,अशोक निकम, नानासो जगदाळे ,बाबली कांबळे आदींनी प्रश्न उपस्थित केले. अधिकारी- ठेकेदार अनुपस्थित पाटण- पंढरपूर रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात व काम थांबवल्याबद्दल ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असताना यामध्ये काही सुधारणा होत नाही. याशिवाय ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे पत्र दिलेले असताना अधिकारी, ठेकेदार यांनी कोलदांडा दिला. ठेकेदाला पाठीशी घातल्याप्रकरणी व ग्रामसभेला उपस्थित न राहिल्याप्रकरणी अधिकार्यांचा निषेध करण्यात आला. गाळा सील करणारः प्रशासक बर्गे बाजारपेठेतील कथित आणि बहुचर्तची वादग्रस्त गाळ्याच्या वापरासंदर्भात ग्रामसभेत पुन्हा वादंग झाला. याप्रकरणी हमरीतुमरी, जोरदार शाब्दिक खडाजंगी होऊन एकमेकांनी खाण्यापर्यंत विषय नेला. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ कळला अखेर प्रशासकांनी याप्रकरणी पोलीस बंदोबस्तात गाळा सील करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामसभेची समाप्ती झाली. Pune District : अतिक्रमणावर कारवाई की पुन्हा तडजोड? प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष