Satara : सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सातारा जिल्हा बँक सन्मानित

सातारा : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्यावतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार संघाचे अध्यक्ष दिलीप संघवी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, तेलंगणा राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्रीनिवास राव यांचे हस्ते बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, सुनील खत्री, रामराव लेंभे, लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अधिकारी वैभव सावंत, तुषार साबळे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख आहे.
सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, ‘शून्य’ टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला असून याच सर्वंकष कामकाजाबद्दल सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, संचालक ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. मकरंद पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन केले.





