Satara: ‘बँको ब्ल्यु रिबीन’ पुरस्काराने जिल्हा बँक सन्मानित

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सहकारी बँकिंग क्षेत्रातील ठेव संकलनामधील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा बँको ब्लू रिबीन अवॉर्ड लोणावळ्याच्या अँबी व्हॅली सिटीमध्ये काल दि. २८ रोजी झालेल्या बँको ॲडव्हानटेज ॲन्युअल समिटच्या समारंभात प्रदान करण्यात आला.
गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक, अविज पब्लीकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे गुंडाळे यांच्यामार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्यावतीने संचालिका सौ. कांचनताई साळुंखे, संचालक रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहूराज जाधव, सेवक संचालक संग्रामसिंह जाधव आणि विकास अधिकारी सचिन अनपट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तज्ज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले. देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मूल्यमापन बँकोच्या ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ट कामकाज आणि १० हजार कोटी रुपयांच्या वर ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेची देशात प्रथम क्रमांकाचे पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित
करण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या ७६ वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण, शेती, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बँकेच्या सातत्यपूर्ण विकासात्मक योगदानामुळे बँकेला आजवर अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, संचालक व खा. उदयनराजे भोसले, ज्येष्ठ संचालक व आ. रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व मान्यवरांनी अभिनंदन केले.
आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. बँको ब्लू रिबीन अवॉर्ड हा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार असून बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीची ही मोठी पोचपावती आहे.
– खा. नितीन पाटील (अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा)





