सातारा : जिल्हा बॅंकेची निवडणूक दिवाळीनंतर होणे शक्य

सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली असून दि. 18 ऑक्टोबर रोजी जिल्हा बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मतदान 20 नोव्हेंबरपूर्वी अथवा नंतर होणार आहे. एकंदर जिल्हा बॅंकेचे फटाके दिवाळीनंतरच वाजणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्हा बॅंकेची निवडणूक जाहीर झाली असली तरी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर नाही. मात्र, कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी विभागीय निबंधक अरुण काकडे तर सांगली जिल्हा बॅंकेसाठी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
सातारा जिल्हा बॅंकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अद्याप तरी कोणाचीच नियुक्ती झालेली नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची प्रारुप मतदार यादी काही दिवसांपूर्वीच तयार झाली. त्यावर 40 हून अधिक हरकती घेण्यात आल्या. या प्रारूप मतदार यादीवर घेतलेल्या हरकतींची सुनावणी होऊन अंतिम मतदारयादी दि. 27 सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे यादीस विलंब झाला. तीनच दिवसांपूर्वी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीनुसार बॅंकेसाठी 1967 इतके मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम दि. 18 ऑक्टोबरच्या दरम्यान जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी कोण असेल, याची घोषणा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी निवडल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. बॅंकेची निवडणूक होणार की बिनविरोध होणार आणि निवडणूक झाली तर ती महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी राहणार की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होणार याकडे राजकीय क्षेत्रातील लोकांच्या नजरा आहेत.





