सातारा – धनगर आरक्षणासाठी सहाव्या दिवशी उपोषण सुरू

लोणंद -धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे, “धनगड’ची धनगर अशी दुरुस्ती करून, राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस करावी, या मागण्यांसाठी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने लोणंद नगरपंचायतीसमोर गणेश केसकर यांचे बेमुदत उपोषण सुरुच आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, उपोषणाच्या सहाव्या दिवशी, मंगळवारी धनगर बांधवांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली, तर महिलांनी भाऊबीज आयोजित केली.
राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे यांनी उपोषणस्थळी केसकर यांची भेट घेतली. कुठलाही प्रश्न पूर्ण अभ्यास करून, सोडवण्याची केसकर यांची जिद्द आहे, असे उद्गार त्यांनी काढले. समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहीन, असे आश्वासनही महात्मे यांनी दिले. उपोषणामुळे केसकर यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी धनगर समाजातील लोणंद परिसरातील महिलांनी केसकर यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
केसकर यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शेकडो धनगर बांधवांनी मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली अंदोरी, कराडवाडी, वाघोशी, मरिआईचीवाडी, बावकवाडी, बाळूपाटलाचीवाडी, पिंपरे, पाडेगाव, लोणंद या मार्गे काढण्यात आली. रॅलीत “येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि धनगर आरक्षणाबाबतच्या घोषणा देण्यात आल्या.





