सातारा :क्षेत्र महाबळेश्वरच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळणार

उपमुखमंत्री अजित पवार यांची ग्वाही; ग्रामस्थांनी घेतली भेट
पाचगणी – श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या 177 कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी अजित पवार यांची नागपूर येथे नुकतीच भेट घेतली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सरपंच सुनील बिरामणे, प्रदीप कात्रट, राजू पुजारी, अनिल कात्रट उपस्थित होते. यावेळी क्षेत्र महाबळेश्वरचा प्रारूप पर्यटन विकास आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.
आमदार पाटील यांनी म्हणाले, क्षेत्र महाबळेश्वरचा पर्यटन विकास झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून, शासनाचा महसूलदेखील वाढणार आहे. महाबळेश्वर येथील पर्यटनस्थळे आणखी विकसित व्हावीत. त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी द्यावा. राज्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मी पुढाकार घेतला आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन मंदिरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजनांचा विचार होणे आवश्यक आहे.
राजपुरे म्हणाले, क्षेत्र महाबळेश्वरचे धार्मिक, अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, नैसर्गिक महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे क्षेत्र जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनेल. सुनील बिरामणे म्हणाले, देवगिरीचे राजे सिंघदेवराय यांनी बाराव्या शतकात या परिसराचा जीर्णोद्धार केला होता. येथे स्वयंभू शिवलिंग असलेले महादेवाचे मंदिर, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या नद्यांचे उगमस्थान असलेले पंचगंगा मंदिर,
समर्थ रामदास स्वामींनी 1644 साली स्थापन केलेला गो मारुती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले रुद्रेश्वराचे मंदिर, हेमांडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले अतिबळेश्वराचे मंदिर, कृष्णाई मंदिर, नृसिंह मंदिर, राम मंदिर, पद्मेश्वर मंदिर, अष्टतीर्थ व नैऋत्येला डोंगराच्या टोकावर गणेश मंदिर आहे.
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला 1665 साली केली होती. या स्मृतिस्थळाबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे. येथील प्रेक्षणीयस्थळांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून पर्यटकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावेळी प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात अजित पवार यांनी अनेक सूचना केल्या.





