Satara DCC Bank: ठरावावरून दोन गट भिडले! अखेर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मैदानात, आखाडेत काय घडले?
Satara DCC Bank: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठराव प्रक्रियेदरम्यान जावळी तालुक्यातील आखाडे येथे दोन राजकीय गटांत जोरदार वाद; घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात.

Satara DCC Bank – सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमध्ये ठराव मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जावळी तालुक्यातील आखाडे येथील सोसायटीच्या ठराव प्रक्रियेवेळी दोन गटांमध्ये मतभेद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला.
याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आखाडे येथे धाव घेऊन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेऊन, संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळून, ठरावाची प्रक्रिया शांततेत झाली.
सोसायटीचा ठराव मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या बाजूने मंजूर झाल्याची माहिती आहे. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीची प्रक्रिया 5 ऑगस्टपर्यंत होणार आहे. विविध मतदारसंघांमधील ठरावांवर सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी काही दिवसांत अशा राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी प्रत्येक सोसायटीचा ठराव महत्त्वाचा आहे.





