Satara DCC Bank: जिल्हा बँकेचा नफा तब्बल २०१ कोटींवर! १२ हजार कोटींहून अधिक ठेवी अन् शून्य टक्के एनपीए
Satara DCC Bank: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा २०२५-२६ या वर्षात भक्कम आर्थिक आलेख; सर्व तरतुदींनंतर तब्बल १२२ कोटी ९८ लाखांचा निव्वळ नफा.

Satara DCC Bank – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५- २६ मध्ये आर्थिक प्रगतीचा भक्कम आलेख नोंदविला आहे. या आर्थिक वर्षात बँकेला करपूर्व ढोबळ नफा २०१ कोटी २३ लाख रुपये, तर सर्व तरतुदींनंतर निव्वळ नफा १२२ कोटी ९८ लाख रुपये झाला आहे. बँकेवरील सभासद व ग्राहकांचा वाढता विश्वास ठेवींच्या आकडेवारीतूनही स्पष्ट होत असून, मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवी १२ हजार ८७० कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.
जिल्ह्याच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून कार्यरत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या दि. २९ रोजी दुपारी १ वाजता बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या सभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बँकेच्या आर्थिक कामगिरीचा तसेच विविध विकासाभिमुख योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
बँकेच्या कर्जवसुलीची कामगिरीही उल्लेखनीय राहिली असून, निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के असल्याचे बँकेने म्हटले आहे. आर्थिक शिस्त, कर्जवसुली आणि ग्राहकाभिमुख बँकिंग या आघाड्यांवर बँकेने भक्कम स्थिती कायम राखली आहे. कृषी, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेकडून विविध नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत.
अहवाल वर्षातील नफ्यातून कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायट्या तसेच सचिवांसाठीही भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नफा केवळ बँकेच्या आर्थिक विस्तारापुरता मर्यादित न ठेवता सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी वापरण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेला आतापर्यंत नाबार्ड, महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनसह विविध सहकारी संस्थांकडून १२३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.





