Satara Crime : प्रेमसंबंधाचा संशय अन् तरुणाचा भयानक शेवट; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Satara Crime : ६ वर्षांपूर्वीच्या खुनाचा खटला निकाली; सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि १४ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची.

Satara Crime : प्रेमसंबंधाच्या संशयातून खून केल्याप्रकरणी आरोपीस वाई न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी जन्मठेप तसेच 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.हा गुन्हा दि. 24 जानेवारी 2018 रोजी दाखल झाला होता. गुन्ह्यात आरोपी रूपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. अभेपुरी, ता. वाई) यास त्याची बहीण व मयत अरुण नामदेव मोहिते यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
याच रागातून आरोपीने अरुण मोहिते याच्या डोक्यात कशानेतरी वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत अंगावरील कपड्यांसह कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. याप्रकरणी मयताचा भाऊ अक्षय नामदेव मोहिते याने वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक येडगे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला वाई न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांच्यासमोर चालला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. ए. आर. कुलकर्णी यांनी कामकाज केले.खटल्यात 14 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, तसेच सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.
त्यानुसार न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून मयताच्या आईस 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.पैरवी अधिकारी म्हणून वाई पोलीस ठाण्याचे हवालदार कदम यांनी काम पाहिले.





