बीडमध्ये न्यायाधीशावरच गुन्हा दाखल; वडवणी न्यायालयातील ‘त्या’ घटनेनंतर खळबळ

बीड : वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदेल यांच्या आत्महत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात आणि न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चक्क न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, एका न्यायाधीशाला कटघेऱ्यात उभे करण्याची वेळ येण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.
दोन दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी सत्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांना त्यांच्या जवळून एक सुसाईड नोट सापडली. या नोटच्या आधारे आणि चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याने दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत असा आरोप आहे की, न्यायाधीश शेख आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून विनायक चंदेल यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
चिठ्ठीत नेमके काय? कुटुंबीयांची मागणी
चंदेल कुटुंबीयांनी आज वडवणी पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. विश्वजीत चंदेल यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांवर कुणाचा तरी दबाव होता. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या नोटमध्ये नेमके काय लिहिले आहे, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी.” कुटुंबीयांच्या मागणीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमध्ये न्यायाधीश शेख यांचे नाव आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
न्यायाधीशाचा राजीनामा, पोलिसांचा शोध सुरू
या घटनेनंतर न्यायाधीश रफिक शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिस आरोपी न्यायाधीश आणि संबंधित कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील या प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्याय मिळण्याची अपेक्षा
विनायक चंदेल यांच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चंदेल कुटुंबीयांनी या प्रकरणात पारदर्शक तपास आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट आणि इतर तपासाच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने पुढे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयीन वर्तुळात खळबळ
एका न्यायाधीशावरच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची ही घटना अभूतपूर्व मानली जात आहे. यामुळे न्यायालयीन वर्तुळात आणि समाजात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





