Satara Civil Hospital: कोट्यवधींचा निधी मंजूर, तरीही रुग्णांचे हाल; ‘या’ एका कारणामुळे आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर
Satara Civil Hospital: राज्यभरातील २५९ आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन, पण सातारा जिल्हा दुर्लक्षित; प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे रुग्ण त्रस्त.

Satara Civil Hospital – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र असूनही आजही अनेक मूलभूत अडचणींना सामोरे जात आहे. राज्य शासनाने अलीकडेच २५९ आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धनाला मंजुरी देऊन आवश्यक पदे व आर्थिक तरतूद मान्य केली असताना जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा त्यात समावेश न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री लाभले असले, तरी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे चित्र बदललेले नाही.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अनेक तांत्रिक सुविधांचा अभाव, प्रशासकीय निर्णयांतील विलंब आणि रिक्त पदांमुळे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असले तरी महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडे रुग्णालयाचा पूर्ण प्रशासकीय कार्यभार अद्याप देण्यात आलेला नसल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांनी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी प्रशासकीय स्तरावरील लालफितीमुळे अनेक प्रस्ताव रखडल्याचा पूर्वानुभव असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मंजूर निधी आणि प्रत्यक्ष सुविधा यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धनासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात सातारा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांना श्रेणीवर्धनाचा लाभ मिळाला असताना सातारा का वगळण्यात आला, याबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज व्यक्त होत आहे.
दररोज शेकडो रुग्णांवर उपचार करणाऱ्या या जिल्हा रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशासकीय सक्षम व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. अन्यथा चार कॅबिनेट मंत्री असूनही साताऱ्याच्या रुग्णांच्या वाट्याला उपचारांचा वनवास हे चित्र कायम राहील, अशी प्रतिक्रिया नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.
‘‘जिल्हा रुग्णालयातील सुविधा सुधारण्यासाठी आणि उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मनुष्यबळ व काही प्रशासकीय बाबी शासनस्तराशी संबंधित आहेत. आवश्यक प्रस्ताव व मागण्या शासनाकडे पाठविण्यात आल्या असून त्यावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
– डॉ. राहुल जाधव (जिल्हा शल्यचिकित्सक)






