सातारा – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात सहभागी व्हावे

सातारा – जिल्हा परिषदेच्या शाळांमधून भक्कम पिढी घडवण्याचे काम होत असून दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी केले.
जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांचा प्रारंभ संतोष हराळे यांच्या हस्ते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. याप्रसंगी श्री. हराळे यांनी शिक्षण विभागाकडून सुरु असलेल्या विदयार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठीच्या उपक्रमांचे कौतुक केले. शिवरायांच्या जीवनातील प्रसंग रोहिणी ढवळे यांनी सांगितला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शबनम मुजावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा हेतू, स्पर्धेचे प्रकार विषद केले. शिक्षण विभागाकडून शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, श्री. आडे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सौ. संगीता बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र खंदारे यांनी आभार मानले.
नऊ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन
या स्पर्धेत वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, हस्तलिखित, प्रश्नमंजुषा, लोकनृत्य, बाललघुनाटिका, गीतमंच व शाहिरी पोवाडा अशा एकूण ९ प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी केले जाते. या स्पर्धांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादरीकरणासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तालुकास्तरावरील लहान गट व मोठा गट स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विदयार्थी व संघ या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर सादरीकरण करणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विदयार्थी व संघांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या संघांनी लोकनृत्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केले.





