सातारा – छ. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तणाव

वडूज – येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी पदाचा गैरवापर करून छ.संभाजी महाराज चौकात अवैधरित्या बांधकाम केले. याबाबत शिवप्रेमी माहिती घेत असताना छ.संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वडूजमध्ये तणाव निर्माण झाला होता. जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी शहरात शेकडो शिवप्रेमींनी निषेध मोर्चा काढला.
शनिवार (दि.५) रोजी रात्री छ.संभाजी महाराज चौकात बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले असल्याचे समजताच शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. याबाबत मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्याकडे विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊन छ. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. सकाळी अकरा वाजता या चौकात शेकडो शिवप्रेमी एकत्रित आले.
छ. संभाजी महाराजांना वंदन करून शिवप्रेमींचा मोर्चा हुतात्मा स्मारकामार्गे बाजार पटांगणातून वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी पोलीस प्रशासनाला शिवप्रेमींनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदनही दिले.
या मोर्चात शहाजीराजे गोडसे, विजयकुमार शिंदे, डॉ. संतोष गोडसे, अजित नलावडे, महेश गोडसे, तानाजी वायदंडे, संजय गोडसे, तानाजी पवार, धनंजय काळे, डाँ. प्रियांका माने, विजय शेटे, मिहीर गोडसे, आबासाहेब भोसले, मधुकर मोहिते, संभाजी गोडसे, राहूल सजगणे,रविंद्र गोडसे, वैभव तोडकर, संजय जगताप, मंगेश मोहिते, रमेश कंठ, शंकर जाधव, सचिन करमारे आदींसह महिला व शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
पोस्ट ही पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी
शनिवारपासून व्हाटसआपवर छ. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट ही पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी आहे. नगरपंचायत नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन कार्यक्रमाच्या कोनशिलेचे बांधकाम सुरू असताना तिथे येऊन अडवणूक करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केल्यामुळे छ. संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आपली चूक लपवण्याचा केविलवाणे प्रयत्न काही व्यक्ती करत आहेत. मी स्वतः मराठा असून छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांच्या विचारांचा अनुयायी आहे. त्यांच्याविषयी अपशब्द बोलणे तर सोडा विचार सुद्धा मनात येऊ शकत नाहीत. आपला बचाव करण्यासाठी काही लोक अफवांना खतपाणी घालत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नये.
कपिल जगताप (मुख्याधिकारी)





