सातारा – ‘सीइओ’ ज्ञानेश्वर खिलारी प्रशिक्षणासाठी मसुरीला

सातारा – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना झाले आहेत. हे प्रशिक्षण सुमारे एक महिन्याचे असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खिलारी यांची सुमारे सव्वा वर्षापुर्वी नियुक्ती झाली होती. खिलारी यांनी गेल्या सव्वा वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. घरकुलांसह अनेक विषयही मार्गी लावले.
जिल्ह्यातील १ हजार ४९६ ग्रामपंचायतीच्या ८ अ दप्तरांची तपासणी करुन ग्रामपंचायत कराची फेरआकारणी केल्याने ग्रामपंचायतीच्या करात सुमारे ३२ टक्कयापर्यंत वाढ झाली. आरोग्य विभागामार्फत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, झऱ्यांचे संवर्धन, मधमाशा संवर्धन व मधाच्या उत्पादनासाठी जिल्हा परिषद सेसमधून मधुमक्षिका पालन ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली.
माझी वसुंधरा अभियान, गावांच्या शाश्वत विकासासाठी विकास आराखडा, पेपरलेस जिल्हा परिषद, माझी शाळा आदर्श शाळा , सिंगल युज प्लॅस्टिक उत्पादनावर बंदी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सातारा जिल्हा परिषदेला राज्यासह देशात नावलौकिक मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्ञानेश्वर खिलारी दि.२२ जानेवारीपासून मसुरी येथील लालबहाद्दूर शास्त्री नॅशनल ॲकडमी ऑफ ॲडमिनीस्ट्रेशन येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत.





