युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच सावकारांवर गुन्हा

दहिवडी – गोंदवले खुर्द (ता. माण) येथील सूरज सुनील शीलवंत या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोंदवले बुद्रुक येथील राम कट्टे, आशुतोष कट्टे, आदर्श कट्टे, शिवतेज कट्टे आणि संजय शेडगे या पाच खाजगी सावकारावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज शीलवंत यांनी गेल्या आठवड्यात घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. सूरज शीलवंत यांनी सावकारांकडून घेतलेले पैसे व्याजासह परत केले होते. तरीदेखील आणखी व्याज उकळण्यासाठी हे पाच खाजगी सावकार सूरज शीलवंत व त्यांचे वडील सुनील शीलवंत यांच्या घरी जाऊन दमदाटी करत होते. आम्हाला आताच्या आता व्याजाचे पैसे द्या. पैसे घेता, पण ते परत द्यायचे कळत नाही का. तुमची जातच फसवी आहे.
तुम्हाला पैसे देऊन पश्चाताप होत आहे, असे म्हणून या सावकारांनी सूरज व सुनील यांना अनेकदा मारहाण करून, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून सूरज शीलवंत यांनी साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पाच खाजगी सावकारांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये, खाजगी सावकारी प्रतिबंध अधिनियमान्वये आणि सूरज शीलवंत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.





