सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाराशिवकर वर गुन्हा

सातारा – आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खंड्या धाराशिवकर वर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (रा. न्यू विकास नगर, सातारा) याने त्याच्या राहत्या घरासमोर बेकायदेशीरपणे आठ ते दहा लोकांचा जमाव जमवून हलगी व फटाके वाजवून स्वतःची मिरवणूक काढून उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणून त्याच्यासह आठ ते दहा अनोळखी इसमांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
सातारा – मैत्रिणीचा नाद सोड, असे म्हणत दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम आवळे, श्रवण पवार, सोमनाथ आवारे (सर्व रा.सातारा शहर परिसर) यांच्या विरुध्द वेदांत अनिल कदम (वय 19, रा. मंगळवार पेठ, सातारा) या युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 16 डिसेंबर रोजी घडली आहे.
दुकान फोडून तीन हजार रोकड लंपास
सातारा – दुकान फोडून अज्ञाताने 3 हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राधिका चौक ते मोती चौक दरम्यान दूध डेअरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने 3 हजार रुपये चोरुन नेले. ही घटना दि. 11 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी गणेश संभाजी जाधव (वय 26, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जबरी चोरी, मारहाणप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा
सातारा – जबरी चोरीसह संबंधितास मारहाण केल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठोसेघर ता.सातारा येथे अज्ञात दोघांनी एकाला अडवून मारहाण करत जबरदस्तीने 1 लाख 5 हजार रुपये घेवून जबरी चोरी केली. अज्ञात दोघांनी कळकाच्या दांडक्याने मारहाण केली असून याप्रकरणी सुर्यकांत शंकर ओव्हाळे (वय 53, रा. धामणेर, ता. कोरेगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.





