सातारा | कराड उत्तरमध्ये भाजपने मारली मुसंडी

सातारा – लोकसभा निवडणुकीनंतर कराड उत्तरच्या राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कराड उत्तर मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्या तुतारीला नाममात्र मताधिक्य मिळाले, त्यामुळे या मतदारसंघात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करत शक्तिस्थान निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असल्याचे चर्चा सुरू झाली आहे
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना हक्काच्या कराड उत्तर मतदारसंघात केवळ एक हजारपेक्षा काही जास्त मतांचे लीड मिळाले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या राजकीय पुनर्वसनाला सर्वात मोठा सेटबॅक याच मतदारसंघातून बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विजयात या मतदारसंघाने साठ हजाराचे लीड २०१९ च्या पोटनिवडणुकीत दिले होते. मात्र, शशिकांत शिंदे यांना कमी मताधिक्य मिळाल्यामुळे मतदारांची आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाराजी आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आमदार बाळासाहेब पाटील यांची या मतदारसंघात हक्काची वोट बँक आहे. वेळेच्या अभावामुळे शशिकांत शिंदे यांच्या प्रचार तंत्रामध्ये काहीसा आलेला विस्कळीतपणा, आमदार बाळासाहेब पाटील यांनी संपर्क यंत्रणा राबवूनही मतदारसंघाबाहेरचा उमेदवार, काही अंशी मतदारांची असलेली नाराजी अशी अनेक करणे या कमी मताधिक्याला असल्याचे जाणवत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह भाजपचे नेते मनोज घोरपडे यांनी विधानसभा निवडणूक गृहीत धरूनच तयारी ठेवल्याने त्यांच्या तयारीचा खासदार उदयनराजे भोसले यांना चांगला फायदा झाला.
फत्यापूर कामेरीसह लगतच्या सर्व गावांनी उदयनराजे यांना शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य दिले. वाठार किरोलीमध्ये भीमराव पाटील व युवा नेते विवेक गायकवाड यांनी भाजपसाठी बरीच मेहनत घेतली. मात्र, कराड उत्तरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणावे तसे तुतारीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले नसल्याची तक्रार आहे. त्यांचा फटका शशिकांत शिंदे यांना बसला मसूरमध्ये तुतारीच्या तुलनेत कमळाला मतदान जास्त झाल्याचे दिसते. कारखाना कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या गावात कमळ फुलले. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काही राजकीय समीकरणांचा फेरविचार करावा लागेल.
मसूर कार्यक्षेत्रात भाजपला झालेले मतदान हीच खरी धोक्याची घंटा आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच राजकीय नेत्यांना मतदारांनी आत्मचिंतनाची वेळ आणली आहे. बाळासाहेब पाटील यांच्यपुढेही आता आत्मपरीक्षणाचाच पर्याय उरला आहे. रहिमतपूरमध्ये शरद पवार गटाचे सुनील माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मदार असताना तुतारीला झालेले मतदान आणि कमळाला झालेले मतदान यामध्ये कमळाने बाजी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. रहिमतपुरात सुनील माने यांची कोंडी करण्यामध्ये भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे, चित्रलेखा माने कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत रहिमतपूरमध्ये त्यांनी सहकाऱ्यांबरोबर घर टू घर प्रचार केला. या निवडणुकीमुळे भाजपचे चिन्ह लोकांच्यात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. कराड उत्तरमधील मसूर, रहिमतपूर या मोठ्या क्षेत्रात बाळासाहेब यांना पुन्हा एकदा राजकीय ताकद लावावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
भाजपचा रस्ता झाला रुंद…
कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व असतानाही शशिकांत शिंदे यांना अपेक्षेऐवढे मताधिक्य मिळाले नाही. त्यांच्या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेला हा मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने मतदारसंघ त्यांच्यासमवेत राहिला. यावेळी मात्र, पक्षीय पातळीवर काय गडबड झाली, मताधिक्य कमी आले हा संशोधनाचा विषय ठरला आहे. याउलट भाजपकडून धैर्यशील पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमरावकाका पाटील अशी सर्व नेतेमंडळी आपापल्या भागात पक्षाला वर्चस्व मिळवून देत आपला रस्ता रुंद करत गेली.





