सातारा – ‘रिपाइं’चे विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन

सातारा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(ए) वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. याबाबत प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाइ न झाल्यास प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येइल असा इशारा यावेळी देण्यात आला.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व युवकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सुरेखा चव्हाण या महिलेस त्रास देणाऱ्यांवर बोरगाव पोलिसांनी कारवाइ केली नाही. पोलिसांनी संबंधित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. या कुटुंबावर झालेला अन्याय दूर करावा. वाढे फाटा, खेड फाटा, अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप परिसर, शाहू चौक परिसरात सुरु असलेला मटका, जुगार धंदा बंद करावा. अक्षय रोकडे व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाइ करावी.
स्थानिक कामगारांना काम न देता परप्रांतीय कामगारांना ठेका मिळण्यास मदत केल्याबाबत अनेकदा रिपाइंने तक्रारी दिल्या आहेत. मात्र कामगार आयुक्तांनी याबाबत दुर्लक्ष केले असल्याने त्यांची चौकशी करावी. खेड जिल्हा परिषद गटात चुकीच्या पध्दतीने दिलेल्या निधीची चौकशी करुन संंबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी रिपाइंच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेवून संबंधितांवर कारवाइ न केल्यास प्रजासत्ताकदिनी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येइल असा इशारा रिपाइं युवकचे अध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी दिला आहे. या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दामिनी निंबाळकर, शहराध्यक्ष राजेंद्र व्हटकर, कोरेगाव अध्यक्ष नितीन बोतालजी, वनिता खवळे, सुरेखा चव्हाण, सुवर्णा माने, गौरी माने, मनिषा नलावडे, कमल पवार, भारती डोंगरे, कल्पना मोहिते, शारदा पवार, संजना पोतदार आदी सहभागी झाले होते.





