सातारा – सातारा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून सातार्यात त्यांचे प्रचार दौरे गतिमान झाले आहेत. सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व सभापती वसंत लेवे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी अमित कदम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. सातारा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि दिवंगत आमदार जी. जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांनी सातारा व जावळी तालुक्यात प्रचार दौरे सुरू केले आहेत. त्यानुसार त्यांची प्रचार यंत्रणा सातारा व जावळी तालुक्यात नियोजनबद्ध रीतीने प्रचार करत आहे. अमित कदम यांनी सातार्यात आपले आप्तेष्ट, हितचिंतक, सहकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दिवाळीची लगबग असतानाही सातार्यातील महत्त्वाच्या मंडळींची भेट घेण्यावर कदम यांनी भर दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांचा बुधवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाला अमित कदम यांनी आपल्या निवडक सहकार्यांसह उपस्थिती दर्शवली. अमित कदम यांनी वसंत लेवे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करत त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची गळाभेट घेतली. राजकारणाच्या पलीकडे असणारी मैत्री या भेटीतून प्रतीत झाली. वसंत लेवे शहराच्या पश्चिम भागातील वजनदार नगरसेवक आहेत. अमित कदम आणि वसंत लेवे यांची गळाभेट भेट राजकीय वर्तुळात मात्र चर्चा घडवून गेली. या भेटीमध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. वसंत लेवे आमचे जुने सहकारी असून आम्ही त्यांना फक्त वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, असे स्पष्टीकरण अमित कदम यांनी दिले आहे.